News - Dapoli Urban Bank Dapoli

Go to content

Main menu:

News

तुमची बॅंक तुमच्या हातात, तुमच्या खिशात.  
जग खूप वेगानं बदलतंय आणि प्रगतीचा नवनवीन टप्पा गाठतंय. आपली बँक त्याला कसा अपवाद असेल? बँकेने देखील साठ वर्षाच्या आपल्या वाटचालीत अनेक नवनवीन संकल्प पूर्ण केले ध्येय गाठली आणि सभासदांच्या खातेदारांच्या मनामध्ये स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. आज आपल्या बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी उपलब्ध केलेलं "माय बँक दापोली अर्बन" हे मोबाईल ॲप म्हणजे सुलभतेचा नवा टप्पा आहे. आता या मोबाईलचा वापर करून खातेदारांना आपले बँकेशी निगडीत असलेले आर्थिक व्यवहार जिथे आहे तिथूनच करता येणार आहेत. सदर अँड्रॉइड ॲपचा उद्घाटन समारंभ बँकेच्या प्रधान कार्यालयामध्ये दापोलीचे नायब तहसीलदार मान. श्री. खोपकर साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी दापोलीचे सहाय्यक निबंधक श्री. बांगर साहेब प्रमुख उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष मान. श्री. जयंतशेठ जालगावकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. "बँकेच्या संचालक मंडळाचे बहुमोल सहकार्य; अधिकारी आणि सेवक वर्गाने केलेले प्रामाणिक प्रयत्न यामुळेच बँकेने आजवरची प्रगती साध्य केली आहे" असे अध्यक्ष महोदयांनी सांगितले. "डिजिटल बँकिंग व कॅशलेस इकॉनोमीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने कार्यान्वित केलेल्या या मोबाईल ॲप सेवेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा व आपल्या बहुमूल्य वेळेची बचत करून घरबसल्या या बँकिंग सेवेचा उपयोग करावा" असे त्यांनी सांगितले.

या समारंभाच्या वेळी बँकेचे आयटी इन्चार्ज श्री शिरीष घाणेकर यांनी "माय बँक दापोली अर्बन" या नवीन मोबाईल ॲप ची सर्व उपस्थितांना माहिती दिली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संभाजीराव थोरात यांनी "या ॲपद्वारे सुरू केलेल्या ग्राहक सेवेचा लाभ बँकेच्या जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा" असे आवाहन केले. त्याचबरोबर ॲप कार्यान्वित करण्यासाठी वापरावयाची कार्यपद्धती व ॲप वापरताना घ्यावयाची दक्षता याबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्राहकांची गरज आणि सोय लक्षात घेऊन तयार केलेले हे ॲप नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास दापोली येथील प्रथितयश व्यापारी श्री. आशिष मेहता, श्री. अतुल मेहता, श्री. राकेश कोटिया, श्री. सुधीर तलाठी, बँकेचे उपाध्यक्ष अन्वरशेठ रखांगे, संचालक डॉ. प्रशांत मेहता, डॉ. वसंत मेहेंदळे, श्री. सुभाष मालू, श्री. अशोक वाडकर, श्री. चंद्रकांत कळसकर, श्री. संदीप दिवेकर, श्री. विनोद आवळे, श्री. संदीप खोचरे, संचालिका सौ. संगीता तलाठी, रमा बेलोसे त्याचबरोबर बँकेचे सभासद श्री. जयंत भावे, श्री. अरुण गांधी, श्री. श्रीराम माजलेकर, विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, बँकेचे अधिकारी व सेवक वर्ग तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संचालक श्री. एम. आर. शेटे यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेचे प्रशासन अधिकारी श्री. रमेश कडू यांनी केले.
Services     Interest Rates     Branches     Contact     Write to Us     Feedback/Complaints
Back to content | Back to main menu